Kanda Pat Thaleepith - कांद्याच्या पातीचे थालीपीठ

नेहमीचे थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर हा वेगळा प्रकार करून बघा. कांदापात आपण नेहमी भाजीत वापरतो, थालीपीठात वापरली तर जरा वेगळ्या चवीचे थालीपीठ खायला मिळते. तसे ही लहान मुले कांदापात भाजी खायला नको बोलतात, पण गरम-गरम थालीपीठ मात्र आवडीने खातात. त्यांच्यासाठी ही कृती नक्की करून बघा.
लागणारा वेळ:  २० मिनिटे
जणांसाठी: ३-४

साहित्य:
  • ३ वाट्या थालीपीठाची भाजणी
  • मुठभर कोथिंबीर, बारीक चिरून
  • १/२ वाटी कांदापात, बारीक  चिरलेली
  • १ कांदा, बारीक चिरून 
  • १ चमचा तिखट
  • तेल
  • मीठ  
कृती:
१. भाजणीमध्ये कांदापात, कांदा, कोथिंबीर, तिखट आणि मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
२.  तेलाचे कडकडीत मोहन घालून, थोडे थोडे पाणी घालून पीठ नीट मळून घ्यावे. पिठाचा मऊसर गोळा झाला पाहिजे.
३. तवा गरम करत ठेवा. त्यावर थोडे तेल टाका.
४. छोटी प्लास्टिक पिशवी घेऊन, तिला थोडासा तेलाचा हात लावा. मळलेल्या पिठातून एक मध्यम गोळा काढा. त्याचे छोटे थालीपीठ थापा. थालीपीठाला मध्यभागी आणि आजूबाजूला छोटी छोटी छिद्र पाडा.
५. तव्यावर मध्यभागी तेल टाकून, गरम झाले कि थापलेले थालीपीठ मध्यभागी टाका. मंद आचेवर भाजू द्या. वरून झाकण ठेवा.  
६. चुरचुर आवाज आला, कि थालीपीठ उलटा आणि दुसऱ्या बाजुने पण नीट खरपूस भाजून घ्या.
७. गरम-गरम थालीपीठ दही किंवा ताज्या लोण्याच्या गोळयाबरोबर खायला वाढा. 
Kanda Pat Thaleepith - कांद्याच्या पातीचे थालीपीठ Kanda Pat Thaleepith - कांद्याच्या पातीचे थालीपीठ Reviewed by Prajakta Patil on February 25, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.