चणाडाळीच्या भज्यांची भाजी

रोज त्याच  त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन भाजी नक्की करून बघा.  माझ्या भाज्यांच्या लिस्ट मध्ये एक नाव add झाले त्यामुळे मी खुश आहे आणि अफलातून चवीमुळे घरचे पण खुश. चला तर मग तुम्ही पण तुमच्या  घरच्यांना खुश करा आणि एका नवीन भाजीची चव बघा...
लागणारा वेळ: १५ - २० मिनिटे 
जणांसाठी: ५-६ 

साहित्य:

  • १/४ किलो चणाडाळ 
  • १ कांदा, बारीक चिरलेला 
  • १ टोमाटो, बारीक चिरलेला 
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट 
  • १ चमचा भाजक्या खोबरं-कांद्याची पेस्ट 
  • तिखट, चवीनुसार 
  • मीठ, चवीनुसार 
  • थोडासा गुळ 
  • १ चमचा धने-जिरे पूड
कृती:
१. चणाडाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर मिक्सर मधून बारीक वाटून काढावी. वाटताना थोडेसे पाणी घालावे.
२. वाटलेल्या चणाडाळीत मीठ, तिखट, चिमुटभर धने-जिरे पूड, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट  आणि अर्धा चमचा तेल घालून नीट मिक्स करावे. पाणी घालू नये.
३. कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे. गरम तेलात वरील चणाडाळीच्या पिठाची भजी सोडावीत.
४. नेहमीप्रमाणे करतो तशी भजी तळून घ्यावीत आणि बाजूला ठेवावीत.
५. कढईमध्ये तेलाची फोडणी करावी. त्यात तिखट, हळद, धने-जिरे पूड घालून परतून घ्यावे.
६. आता बारीक कापलेला कांदा आणि टोमाटो घालून ५ मिनिटे परतून घ्यावे.
७. वरील परतलेल्या मिश्रणात गरजेपुरते पाणी आणि चवीनुसार मीठ, थोडासा गूळ घालून १ उकळी येऊ द्यावी.
८. आता वरील उकळलेल्या रश्यामध्ये तळलेली डाळीची भजी घालून ५ मिनिटे उकळू द्यावे.
८. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे आणि गरम गरम वाढावे.

ही रस्साभाजी तांदुळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर छान लागते. ही भाजी आपण मसूर किंवा मुग डाळ वापरून सुद्धा करू शकतो.
चणाडाळीच्या भज्यांची भाजी चणाडाळीच्या भज्यांची भाजी Reviewed by Prajakta Patil on February 13, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.