Samosa - समोसा

समोसा ही महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय डिश आहे. समोसा चहाबरोबर किंवा नाश्त्याला खूप छान लागतो. समोसा बनवायला खूप कठीण आहे असे वाटून खूपजण बाहेरून आणून खाणे पसंत करतात. पण खालील समोसा बनवण्याची कृती वाचली कि तुम्हाला कळेल कि समोसा बनवणे किती सोपे आहे ते ! कुरकुरीत, चटकदार, मसालेदार समोश्याची कृती खाली देत आहे.


लागणारा वेळ: १ तास ३० मिनिटे 
जणांसाठी: १०-१२ समोसे 

आवरणाचे साहित्य:
 • १ कप मैदा 
 • २ चमचे तेल 
 • ओवा, चिमुटभर 
 • पाणी, पीठ मळण्यासाठी 
 • मीठ, चवीनुसार 
 • तेल, टाळण्यासाठी 
सारणाचे साहित्य:
 • २  उकडलेले बटाटे, साले काढून आणि कुस्करून 
 • १/४ कप उकडलेले मटार 
 • १ चमचा लाल तिखट 
 • २ हिरव्या मिरच्या, बारीक केलेल्या 
 • १/२ चमचा धने पूड 
 • १/२ चमचा किसलेले आले,
 • १ चमचा गरम मसाला 
 • १/२ चमचा साखर 
 • १ चमचा लिंबू रस 
 • जिरे पूड, आमचूर पावडर, कसुरी मेथी चिमुटभर 
 • कोथिंबीर, बारीक चिरलेली 
पीठ मळण्याची कृती:
१. एका भांड्यात मैदा, मीठ आणि ओवा घेऊन नीट मिक्स करा. ह्या मिश्रणात २ चमचे तेल टाका म्हणजे मिश्रण मऊ होईल .
२. थोडे थोडे पाणी मिश्रणात घालत राहा आणि पीठ निट मळून घ्या.
३. साधारण ४-५ मिनिटे पीठ मळा म्हणजे पीठ मऊ होईल.
४. १५-२० मिनिटांसाठी पीठ ओलसर कपड्याने झाकून ठेवा.
सारण बनवण्याची कृती:
१. एका मोठ्या थाळीमध्ये, उकडलेले बटाटे घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला. ह्या मिश्रणात धने पूड, आमचूर पावडर, गरम मसाला, साखर, हिरवी मिरची,कसुरी मेथी, लिंबू रस, जिरे पूड घालून नीट मिक्स करा.
२. एका भांड्यात तेल घेऊन ते gas वर गरम करत ठेवा. तेल गरम झाले कि त्यात जिरे, हिंग घाला. लालसर होईपर्यंत fry करा. आता ह्या भांड्यात मटार घाला आणि २-३ मिनिटे शिजवून घ्या. 
३. आता ह्यात बटाट्याचे मिश्रण घाला आणि मध्यम आचेवर ४-५ मिनिटे शिजवून घ्या. वरून कोथिंबीर घालून gas बंद करा.
४. सामोश्याचे सारण तयार झाले आहे आता बाहेरील आवरण तयार करायला घ्यावे.

बाहेरील आवरण बनवण्याची कृती:
१. तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्याची ६ इंचाची पोळी बनवून घ्या. ही पोळी बरोबर मधून कट करा. त्यामुळे एका पोळीचे २ अर्धगोल तयार होतील.
२. त्यापैकी १ अर्धगोल घेऊन त्याच्या एका कडेच्या मागच्या बाजूला थोडे पाणी लावा.
३. ह्या पाणी लावलेल्या बाजूवर दुसरी बाजू हलकेच दाबून ठेवा आणि त्रिकोणाचा आकार द्या. 
४. आता ह्या कोनामध्ये तयार सारण भरा. सारण जास्त भरू नका.
५. आता वरच्या बाजूला सुद्धा पाण्याचा हात लावून घ्या आणि हलक्या हाताने कडा बंद करा. कडा बंद करताना सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
६. ह्या पद्धतीने बाकीच्या गोळ्यांचे समोसे करून घ्या.
७. pan मध्ये तेल घेऊन ते गरम करत ठेवा. तेल थोडे तापले की त्यात २-३ समोसे टाका. दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत समोसे तळून घ्या. 
८. तयार समोसे चिंचेच्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबर सर्व्ह करा.
Samosa - समोसा Samosa - समोसा Reviewed by Prajakta Patil on January 16, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.