Gul Poli - गुळपोळी

गुळपोळी हा भारतीयांचा मकर संक्रांतीचा पारंपारिक पदार्थ आहे. तीळ आणि गुळापासून हि पोळी बनवली जाते. मकर-संक्रांतीच्या दिवशी गुळ-पोळीचा नैवेद्य देवाला दाखवतात. गरम किंवा गार पोळी कशीही चांगली लागते. गरम असताना वरून तुपाची धार सोडून खाताना काही वेगळीच मज्जा येते.लागणारा वेळ
: ४०-५० मिनिटे
जणांसाठी: १०-१२ पोळ्या

साहित्य
:
 • १ कप कणिक
 • १  कप मैदा 
 • २ चमचे बेसन 
 • मीठ चवीनुसार 
 • ३/४ कप दुध 
 • ४ चमचे तेल 
 • ५-६ वेलदोड्यांची पूड 
 • १/४ कप सुक्या खोबऱ्याचा कीस 
 • १/४ कप पांढरे तीळ 
 • १ कप गूळ 
 • १/४ कप खसखस 
 • १/४ कप बेसन 
 • तूप  

कृती:
१. एका भांड्यात तेलाचे कडकडीत मोहन तयार करून घ्या.
२. कणिक, मैदा आणि बेसन पीठ एकत्र करून घ्या. त्यात थोडेसे मीठ घालून निट एकजीव करून घ्या.
३. ह्या मिश्रणात तेलाचे मोहन घालून नेहमी पोळीसाठी भिजवतो तसे  पीठ भिजवून घ्यावे.
४. वरून थोडे दुध घालून मऊसर कणिक मळून घ्या आणि बाजूला ठेऊन द्या.
५. तीळ, खसखस आणि खोबरे सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे आणि मग बारीक करून घ्यावे. 
६. गूळ किसून घ्यावा.
७. एका भांड्यात तूप घेऊन ते गरम होऊ द्यावे. ह्या पातळ झालेल्या तुपात मग बेसन पीठ घालून मंद आचेवर  चांगले भाजून घ्यावे. गरज लागल्यास थोडे थोडे तूप ओतावे.
८. बेसनाचे मिश्रण थंड झाले कि त्यात  वेलची पूड, आणि बारीक केलेले तीळ, खसखस आणि खोबरे घालून नीट मळून घ्यावे.मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ठेवा.

पोळी लाटण्याची कृती:
गुळाची ही पोळी आपण २ प्रकारे लाटू शकतो
प्रकार १
१. तयार कणकेचे मध्यम गोळे करून घ्या. त्यातील १ गोळा पोळपाटावर घेऊन जाडसर पुरीइतका लाटून घ्या.
२. ह्या लाटलेल्या पोळीमध्ये वरील गुळाचे तयार सारण भरून मोदकाचा आकार द्या. आता वरील जाडसर टोक हलकेच आतमध्ये दाबा. आणि त्याचा गोळा करून घ्या.
३. हलक्या हाताने पोळी लाटा.
४. गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या. भाजताना मध्येच दोन्ही बाजूला तूप सोडावे.

प्रकार २:
१. तयार कणकेतून २ गोळे काढून घ्या. साधारण ७०:३० ratio मध्ये गोळे असावेत.
२. दोन्ही गोळे पुरीइतके लाटून घ्या. मोठ्या गोळ्याची पोळी मोठी असावी आणि लहान गोळ्याची लहान असावी.
३. आता मोठ्या पोळीवर गुळाचे  तयार सारण भरून त्यावर दुसरी लहान पोळी ठेवावी.
४. दोन्ही पोळ्यांच्या कडा एकमेकांवर दाबून बंद करून टाका आणि त्याचा एकच गोळा बनवा.
५. आता हलक्या हाताने पोळी लाटा.
६. गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या. भाजताना मध्येच दोन्ही बाजूला तूप सोडावे.

ही पोळी गारच छान लागते म्हणून ३-४ दिवस अगोदर करून ठेवावी.
Gul Poli - गुळपोळी Gul Poli - गुळपोळी Reviewed by Prajakta Patil on January 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.